Wednesday 11 December 2013

मी आणि माझे प्रश्न

काही लोकं कशी आखीव रेखीव असतात. पूर्ण शहाणी. त्यांचे कपडे कायम इस्त्री केलेले. केस विंचरले नाहीत तरी विंचरलेले दिसणारे. त्यांना कधी प्रश्नच पडत नाहीत. तो जो सुखी माणसाचा सदरा आहेना तो ह्याच माणसांकडे सापडत असावा. खरच त्यांना प्रश्न पडत नाहीत, त्यामुळे उत्तर शोधण्यासाठी धडपडावे लागत नाही. गोष्टीतला राजा सुखी नव्हता कारण त्याला प्रश्न होते, त्याला फार प्रश्न पडले. कदाचित त्यालाही पडले असतील आपल्यासारखे  sorry  माझ्यासारखे (कुणास ठाऊक तुम्हीही सुखी सदरावाले असाल).त्याला पडले असतील प्रश्न जसे देव आहे का? आपण कसे वागावे? जीवनाचा आनंद घेत राहावे कि लोकांचे जगणे सुखकर करावे? कुणास ठाऊक.


  पण एक मात्र नक्की त्या शेतकऱ्याला (किंवा तो जो कोणी होता) प्रश्न नव्हते. त्याला साधा सदरा विकत घ्यावा एवढी सुद्धा चिंता नव्हती म्हणून तो सुखी होता. त्यला कदाचित प्रगती करावी असे वाटतच नसेल? त्याला नसेल वाटत उत्तरं शोधावीत प्रश्नांची? कि त्याला प्रश्नच पडत नसतील? त्याला शोधावस वाटत नसेल कि आकाश निळे का? पाणी का वाहत? सफरचंद का पडते? त्याला वाटतच नसेल कि जगणे त्याला लक्षात ठेवाव.


 पण मग बरोबर कोण? प्रश्न न पडणारा तो कि प्रश्नांनी वेडा होणारा राजा? (सुखी माणूस कोण हा हि प्रश्नच झाला कि) एकदा नजर फिरवा हि सुखी सदरवली लोकं लगेच दिसतील. त्यांना आपल्यासारखे प्रश्न पडत नाहीत. त्यांना सकाळी उठल्यावर आज कोणते कपडे घालू हा हि प्रश्न पडत नसावा. त्यांच्याकडे कायम वेळ असतो. सगळी काम पूर्ण करून टीव्हीवरच्या सगळ्या मालिका बघायला वेळ असतो. आणि एवढ्या मालिका बघूनही त्यांना प्रश्न पडत नाहीत. आम्ही एक मालिका बघितली कि आम्हाला प्रश्न पडतात, ‘असल्या साड्या कोणी खरोखरच घालत का? एवढे दागिने कोणी घरात वापरत का? असल्या बायका कुठे असतात? (‘दिल्या घरी तू सुखी राहा’ नावाच्या मालिकेची जाहिरात बघून सुद्धा मला हे प्रश्न पडतात विशेषतः शेवटचा प्रश्न )


 मग आम्ही मालिका बघंच सोडून देतो आणि चित्रपट बघतो. पण मला सांगा ह्या सुखी सदरावाल्यांना प्रश्न का पडत नाहीत? कि मराठी भाषा संपेल का? आत्ताच्या पिढीचे काय होणार? अण्णा हजारेंच्या उपोषणाचे काय होणार?


मग हेच लोकं प्रश्न पडणाऱ्यांना वेड्यात काढतात. ते म्हणतात कि ज्ञानोबांची मराठी संपणारच नाही. आम्हाला ह्यावरही प्रश्न पडतात कि खुद्द देववाणी संस्कृत संपली, मग मराठीचे काय? पण हे सदरावले शांत असतात. त्यांना बघून आजकाल मलाही मोह होतो हे प्रस्न कुणालातरी देऊन टाकायचा. फार भार आहे हो ह्या प्रश्नांचा. तुम्हाला नाही पडत असे प्रश्न? जेव्हा कल्पना चावला अंतराळात पोहोचते आणि तिच्याच देशात एक मुलगी उकळत्या दुधात मारली जाते?


 खरंच प्रश्न न पडणारे लोकं सुखी आहेत. पण एक सांगा, जर कुणालाच प्रश्न पडले नाहीत तर कधीच उत्तरं मिळणार नाहीत. प्रश्न शिवरायांना पडला, जिजामातेला पडला आणि हिंदवी स्वराज्य स्थापन झाले. प्रश्न टिळकांना, गांधीना पडला आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. प्रश्न बाबा आमटेंना पडला असेल त्यातूनच आनंदवन उभे राहिले.


 पण  प्रश्न सोडविण्यासाठी तुमच्या मनगटात बळ हवे. आणि ज्यांना नुसतेच प्रश्न पडतात; पण उत्तरे शोधावीशी वाटत नाहीत त्यांनी म्हणजे आपण साऱ्यांनी एक-एक सदरा घेऊया , कारण हे प्रश्न फार त्रास देतात. खरच कमीतकमी आपण शांततरी राहू शकू. कारण ‘आपण काहीच का करत नाही?’ हा प्रश्न सर्वात जास्त त्रासदायक आहे. नाही का?